पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेत धुसफूस कायम, कल्याणमध्ये २६ नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांचे राजीनामे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

कल्याण पूर्वची जागा युतीच्या जागा वाटपात भाजपला गेल्यानंतर आता शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला स्थानिक शिवसैनिक आणि नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहेत. बंडखोर उमेदवाराला आमचा पाठिंबा असल्याचे राजीनामा दिलेल्या नगरसेवकांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांचे हे बंड शमविण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे असणार आहे.

कल्याण पूर्वची जागा भाजपकडे गेल्यानंतर या मतदारसंघातून भाजपने गेल्यावेळेला अपक्ष म्हणून निवडून आलेले गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली. २०१४ मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. पण ही जागा शिवसेनेच्या वाट्याला यायला हवी होती, अशी स्थानिक शिवसैनिकांची मागणी होती. त्यामुळे त्यांनी बंडखोर उमेदवार धनंजय बोराडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना विजयी करण्यासाठीच आपण प्रयत्न करणार असल्याचे राजीनामा दिलेल्या नगरसेवक आणि शिवसेना कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारी आपल्या पदाचे राजीनामे शिवसेना पक्षप्रमुखांकडे पाठवून दिले.

नगरसेवक धनंजय बोराडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घ्यायला नकार दिला होता. त्याचबरोबर आपल्या उमेदवारीवर ते कायम राहिले होते. शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड, नीलेश शिंदे, नवीन गवळी, हर्षवर्धन पालांडे यांनी बोराडे यांचे समर्थन केले आहे.