पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : मी विरोधी होणार अर्थात सत्तेचा त्रिकोण

प्रातिनिधिक छायाचित्र

"मला माहितंय तू मला कधीच वश होणार नाहीस, पण म्हणून मी तुझा नाद सोडला असे मानू नकोस. तुझ्या समोरच्या गल्लीत येऊन राहिन, सतत तुला टोचणी लावीन आणि कधी ना कधी तुला माझ्यावर भाळायला भाग पाडेलच..."

गल्लीच्या मागे असलेल्या मैदानातून गर्जना उमटली आणि एका रोचक कथेची अखेर झाल्याचे सर्वांना कळून चुकले. एखादे रंगतदार पुस्तक वाचता वाचता आणि त्याचा शेवट येता-येता उरलेल्या पानांवर शाई सांडावी, एखाद्या मनोरंजक चित्रपटाचा क्लायमॅक्स केवळ दहा मिनिटांवर आलेला असताना लाईट जावेत, सिग्नल सुटायच्या ऐन वेळेस मध्येच टँकर येऊन वाहतूक खोळंबावी, अशी काहीशी स्थिती झाली. हा 'आवाज कोणाचा' आणि कोणाला उद्देशून होता, हे चटकन लक्षात आले.
अर्थात त्यासाठी तुम्हाला त्याची पार्श्वभूमी माहिती असायलाच पाहिजे. त्याचे झाले असे की, आमच्या गल्लीत एक धमाल प्रेमकथा नुकतीच घडली. या कथेत अपात्र भरपूर, पण पात्रे मोजकीच. युतीकुमार, आघाडीराव आणि सत्ताकुमारी. तशी या तिघांची कथा सुरळीत चालली होती, पण मनश्या नावाच्या एका पोराने त्यांच्यात बिब्बा घातला आणि त्या कथेला जरा रंजक वळण मिळाले. हा आवाज याच मनश्याचा होता. त्यानेच आपल्या माघारीची घोषणा केली होती आणि या वांड पोराने मग इतका दंगा का घातला, आजवर एवढी उठाठेव का केली, हेच कळेनासे झाले.

सत्ताकुमारी ही आमच्या गल्लीची सौंदर्यवती. सगळ्याच सुंदऱ्या असतात तशी ती चंचला होती. कधी आघाडीराव तर कधी युतीकुमारांशी तिचे सूत जुळायचे. आमच्या बेजार जीवनाला त्यांच्या चटकदार किश्श्यांचा आधार होता. आज इकडे तर आज तिकडे अशी ती फिरणार आणि ती कधी माघारी फिरणार, यावर आमच्या पैजा लागलेल्या. असं सगळं बरं चाललं होतं, अस्मानी-सुलतानी दुःख विसरायला झालं होतं.

पण त्यात या मनश्याने येऊन पचका केला. हे पोट्टं गल्लीत आलं आणि त्याने सगळ्या जुळलेल्या जोड्या तोडायला सुरूवात केली. हे उनाड कार्टं आलं तेव्हा सत्ताकुमारीची आघाडीरावांशी इश्कबाजी सुरू होती. दोघांचे सूत उत्तम जमले होते. त्यांचा हा धागा कोणी तोडेल, असे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते. पण मनश्या आला आणि त्याने आघाडीरावाचे वाभाडे काढायला सुरूवात केली. आघाडीरावाचे बाहेर अनेक लफडे आहेत आणि तो सत्ताकुमारीला दगा दिल्याची बोंब त्याने सर्वात आधी मारली.

दूध ठेवलेल्या फ्रिजबाहेर घुटमळणाऱ्या मांजरासारखा युतीकुमार तोवर सत्ताकुमारीच्या पुढे-मागे घोटाळत होता. त्याने ही संधी साधली. मनश्या जोरात होता, आघाडीरावाला तोंड दाखवायला जागा उरली नाही आणि युतीकुमाराच्या आनंदाला पारावार उरला नाही, अशी स्थिती आली. गल्लीतील सगळी कट्ट्यावरची पोरं आणि कुठेही सोय न लागलेली पोरं त्याच्यामागे आली. आघाडीरावाला बदनाम करण्यासाठी त्याने आकाशपाताळ एक केले. जो आडवा येईल त्याला 'आडवा'च करू म्हणून दम दिला. बाहेरच्या गल्लीतील काही जणांना खरोखर त्याने आडवे केलेही. त्याचे हे प्रात्यक्षिक पाहून इतरांनी सरळमार्गपणा हेच उत्तम धोरण म्हणून स्वीकारले.

एवढे झाले तरी सत्ताकुमारी काही मनश्यावर भाळली नाही. तिची आपली युतीकुमाराशी नेत्रपल्लवी सुरू झाली. दुसरीकडे ही काही आपल्याला पटत नाही, असे पाहून मनश्याही मनातून खट्टू झाला. तो पुन्हा भयाण वाफ सोडणाऱ्या पण स्थानकातच थांबलेल्या इंजिनासारखा धुसफुसत राहिला. रेल्वेच्या रूळासारखे आपण आणि सत्ता समांतर धावणार, पण कधीही एकत्र येणार नाही असे काहीसे नैराश्याचे विचार त्याच्या मनात येऊ लागले. इकडे आपल्या युतीकुमाराने ही संधी साधली.
खरे सांगायचे तर युतीकुमाराचे तोपर्यंत सत्ताकुमारीकडे बघत डोळे मारून-मारून सुजले होते. पण एकदा तिचा 'सिग्नल' मिळाला आणि डोळ्यांत प्राण आणून याने पुन्हा तिच्याकडे आशाळभूतपणे पाहायला सुरूवात केली. मग काय, झाले की दोघांचे मनोमीलन आणि आघाडीरावाला फुटाची गोळी मिळाली. पण मनश्या होता तिथेच राहिला. किंबहुना त्याची हालत आणखीनच वाईट झाली. हा थोडक्या-थोडक्याने निराश होतो म्हणून कामाचे लोक त्याला जवळ घेईनात आणि हा नको तिथे आपले बिंग फोडतो म्हणून भानगडवालेही सोबत घेईनात.

गेले काही महिने युतीकुमार आणि सत्तेचे प्रेम प्रकरण उत्तम चालले होते. भांड्याला भांडे लागत होते, पण मातीच्या माठासारखे ते फुटले नाहीत. वाटेत काटे होते, पण काट्याचा नायटा झाला नाही. मात्र काय झाले कुणास ठाऊक, मनश्याने पुन्हा उचल खाल्ली. आघाडीरावावर केलेलाच प्रयोग त्याने युतीकुमारावर केला. हा सत्ताकुमारीला पायाची दासी म्हणून वागवतो, तिला मोकळीक देतो, बाहेरख्यालीपणा करतो अशा अनेक बोंबा त्याने ठोकल्या. पुन्हा एकवार तीच धमाल, तोच गोंधळ. गल्लीतील त्याच्यासारखीच ओवाळून टाकलेली काही मुले याही वेळेस त्याच्या सोबत आली. पण सत्ताकुमारी काही युतीकुमाराला सोडायला तयार नव्हती. बिच्चारी! युतीकुमाराने तिच्यावर काय जादू केली काय माहीत?

अन् आता मनश्या पुन्हा खच्ची झाला. माझं काय चुकलं, हा प्रश्न तो त्याला त्याला विचारू लागला. पण त्याचा इतिहास बहुतेकांना माहित असल्यामुळे त्याला खरे तरी कोण बोलणार? अखेर ही काही आपल्याला बधत नाही, हे त्याने ओळखले. होती नाही ती सगळी हिंमत एकवटली आणि त्याने तिला मैदानात बोलावले. आता हा काही तरी महत्त्वाचे बोलणार म्हणून तीही वाट पाहत होती, मनश्याही समजुतीने काही बोलेल म्हणून गल्लीही ताटकळली होती. पण समंजसपणे वागणे-बोलणे मनश्याच्या स्वभावातच कुठे होते? जे करायचे ते बेधडक आणि बेमुर्वतपणे करायचे हा त्याचा खाक्या होता. म्हणूनच मैदानात सत्ताकुमारीला बोलावून तो म्हणाला, "आघाडीरावाने तुझा नाद सोडला असंल, मी नाही सोडला. युतीकुमारसोबत सुखाने राहिन, असे तुला वाटत असेल. पण मी त्याला सळो की पळो करेन. पाहशीलच तू...मी मैदानातून जाईन, पण गल्लीतच राहिन, पाहशीलच तू."

म्हणजेच युतीकुमाराच्या हाती तिला सोपवून मनश्याने गुपचूप पाय काढता घेतला होता. "मी विरोधी होणार," असे दरडावून सांगून त्याने पराभव गिळला आणि पचवला होता. पण मग त्याने हा खटाटोप का केला, हेच कोणाला कळाले नाही. हा प्रश्न अर्धवट ठेवूनच हा सत्तेचा त्रिकोण पूर्ण झाला.

- देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com