पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : राम शिंदे की रोहित पवार, कर्जत-जामखेडकरांच्या मनात काय?

रोहित पवार आणि राम शिंदे

२००७ मध्ये झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अगदी मतदानाच्या दिवशी पुण्यातील एका मोठ्या दैनिकामध्ये मुख्य बातमीचा मथळा होता की 'खड्डे लक्षात ठेवणार की विसरणार?' त्यावेळी पुण्यात खड्ड्यांचा प्रश्न खूप गाजत होता. त्यातच ऐन मतदानाच्या दिवशी त्या वृत्तपत्राने खड्ड्यांचा मुद्दा पहिल्या पानावर प्रसिद्ध केल्यामुळे महापालिका निवडणुकीचा निकाल फिरल्याचे नंतर राजकीय विश्लेषकांनी म्हटले होते. त्यावेळी सोशल मीडिया इतका प्रभावी नव्हता. त्यामुळे पहिल्या पानावरील ती बातमी अगदीच निर्णायक ठरली होती. हे आज आठवण्याचे कारण म्हणजे नुकताच नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचा केलेला अभ्यास दौरा. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ज्या लक्षवेधी किंवा चुरशीच्या लढती होत आहेत. त्यामध्ये नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघ वरच्या स्थानावर आहे. अर्थात त्याला कारणही तसेच आहे म्हणा. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर आव्हान आहे भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ हिरावून घेण्याचे. हे काम साध्य करण्यासाठी जो मार्ग त्यांनी निवडला आहे तो आहे मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातील लोकांसाठी पुरविले जाणारे पाणी. 

गेल्या काही वर्षांपासून ते या मतदारसंघातील दुष्काळग्रस्त आणि तहानलेल्या गावांमध्ये त्यांच्या संस्थेमार्फत पाणी पुरवठा करताहेत आणि हाच पाण्याचा मुद्दा मतदारसंघात कळीचा बनला आहे. हे इथे फिरल्यावर जाणवते. मतदारसंघातील लढत चुरशीची आहे. कुणाचे पारडे जड किंवा कुणाचे हलके अशी स्थिती अजिबात नाही. कारण भाजपचे उमेदवार आणि राज्यातील मंत्री राम शिंदे यांनाही या मतदारसंघाची असलेली खडा न खडा माहिती. सलग दोनवेळा राम शिंदे कर्जत जामखेडमधूनच मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. सहज २०१४ मधील मतमोजणीचे आकडे बघितले तर परिस्थिती काय आहे लक्षात येते. त्यावेळी राज्यात सगळेच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. असे असताना राम शिंदे यांना एकूण मतांपैकी ४३ टक्के मते मिळाली होती. त्यांनी ३७ हजारांच्या मताधिक्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिला होता. अर्थात तो उमेदवार पवार कुटुंबातील नव्हता. पण गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील चित्र बदलले आहे. आमदार आणि मंत्री म्हणून राम शिंदे यांनी जशी मतदारसंघात कामे केली आहेत. तसेच या मतदारसंघात जम बसविण्यासाठी रोहित पवार यांनीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.

कर्जत जामखेड हा तसा भौगोलिकदृष्ट्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदारसंघ. विधानसभेचा मतदारसंघ असला तरी एका दिवसात पिंजून काढणे केवळ अशक्यच. कर्जत आणि जामखेड असे दोन तालुके या मतदारसंघात येतात. कर्जत तालुका तसा मोठा. त्यामुळे इथे मतदारही जास्त. तुलनेत जामखेडमध्ये मतदार कमी आहेत. आता हे तालुके कोणाच्या पाठिशी उभे राहणार यावरही निकालाचे चित्र अवलंबून आहे. मतदारसंघात मिळून २०३ गावं आहेत. जातीची समीकरणं बघितली तर धनगर समाजाचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ. मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहे. राम शिंदे यांचे चौंडी हे गाव जामखेडमध्ये येते. तर रोहित पवार हे या मतदारसंघातील रहिवासी नाहीत. ते सध्या कर्जतमध्ये मुक्कामाला आहेत. पण त्याचे मूळ गाव कोणते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे हा मुद्दाही प्रचारात उपस्थित केला जातो आहे.  

मतदारसंघात अनेकांशी सहज बोलताना जे मुद्दे त्यांच्या तोंडातून येतात. त्यातून तरी इथली निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार होईल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. गावात पारावर बसलेल्या ग्रामस्थांपैकी दोघे गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेली रस्त्याची कामे, जलयुक्त शिवारची कामे सांगत असतील तर तिथेच त्यांच्यासोबत बसलेले अन्य दोघे जण पाण्याचा मुद्दा उपस्थित करतात. सध्या पाणी कोण देतंय हे सांगतात आणि सूचकपणे यावेळी काय घडू शकते, याची जाणीव करून देतात.

एकीकडे मतदारसंघात असे घडत असताना दुसरीकडे राज्यात भाजपकडून परिवारवादाचा मुद्दा प्रभावीपणे उचलला जातोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कसे परिवारवादी पक्ष आहेत, याचा जवळपास प्रत्येक सभेत वापर केला जातोय. त्याचा इथल्या निवडणुकीवर परिणाम होईल का, हे सुद्धा बघावे लागेल. रोहित पवार हे जरी पवार कुटुंबातील असले तरी त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय वारशांचा वापर केलेला नाही, असे इथले बरेच लोक सांगतात. त्यांचा चेहरा आमच्या लक्षात आहे एवढेच ते सांगतात आणि त्यांच्या संस्थेने केलेली कामे आठवतात. आता २१ तारखेला मतदान करायला जाताना मतदार काय लक्षात ठेवून ईव्हीएमवरील बटण दाबणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. ते विकासकामे झाल्याचे लक्षात ठेवणार की पाण्यासाठी आपल्याला कोणी मदत केली हे आठवून मतदान करणार हे २४ ऑक्टोबरलाच कळेल. कर्जत-जामखेडमधील निवडणुकीत आपला प्रतिनिधी निवडणे हेच मतदारांपुढील खरे आव्हान असणार एवढे नक्की!

- विश्वनाथ गरुड
wishwanath.garud@htdigital.in