पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : हाव इज जोश!..बटन दाबताना राहिल का 'होश'

राहुल गांधी

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. प्रधानसेवकही अभ्यासू नेतृत्वाखाली राज्यात फुललेल्या कमळाचा मळा आणखी बहरदार करण्यासाठी वणवण करत आहेत. (हेलिकॉप्टरने फिरत असले तरी मेहनत आलीच की) एकेकाळी एक हाती सत्ता मागणाऱ्या राज ठाकरेंनी तर विरोधी पक्ष म्हणून मतदारांच्या पुढे नवा डाव मांडल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ८० वर्षांचा जवान मोठ्या ताकदीनं राज्य पिंजून काढतानाचे चित्र पाहायला मिळाल्याची चर्चा रंगली.

BLOG: मी आशावादी !

या सर्व रणधूमाळीत राज्याच्या निवडणुकीत गेली काँग्रेस कुणीकडे? असा प्रश्न निर्माण झाला. माझ्या माहितीनुसार काँग्रेस नावाची एक वनस्पती आहे. तिच वैशिष्ट हे की पडेल तिथे उगवते. पण सध्याच्या घडीला राजकीय आखाड्यातील काँग्रेसची अवस्था उभा राहिल तिथे पडेल, अशी काहीशी झालीय. विरोधकांच्या खेळीसमोर नतमस्तक झालेल्या युवराजांच्या येण्याने काँग्रेसही निवडणुकीत असल्यासारखे फिल निर्माण झाले. ज्या मोजक्या सभा झाल्या त्यात युवराजांनी चांगली बॅटिंग केली.  

क्रिकेटच्या मैदानात फार्मात नसल्याच्या कारणावरुन  प्रसारमाध्यमांचे मथळे सजवत असलेल्या गड्याला संघात स्थान मिळाल्यानंतर फूलटॉस चेंडूही संयमान खेळून रिदममध्ये येण्याचे टेन्शन असते. राज्यातील निवडणुकीतील प्रचारात सहभागी होताना युवराजांची अगदी हिच अवस्था होती. लातूरच्या पहिल्या सभेत त्यांनी तो संयम दाखवला. एखाद्या फलंदाजांने गोलंदाजाच्या गतीच्या जोरावर अप्रतिमरित्या धावा कराव्या अगदी तसेच युवराजांनी सत्ताधाऱ्यांच्या शब्द फेकीचा वापर करुन शांत बॅटिंग केली. सत्ताधाऱ्यांनी प्रचारात वापरलेल्या जम्मू काश्मीरमधील कलम ३७०, बेरोजगारी आणि अच्छे दिन या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांनी हे सर्व झाले का? असा जनतेला सवाल करत पदरमोड करुन आश्वासने देण्याचा खटाटोप टाळला. ट्विटरवर राहुल लयभारी ट्रेंड पाहायला मिळाला त्यावेळी गेली काँग्रेस कुणीकडे तिढा सुटला अन् काँग्रेस अभी जिंदा है! याची प्रचिती आली. आता त्याचा फायदा होणार का? हे २४ तारखेलाच कळेल.  

BLOG : ही युती (जागेवरून) तुटायची नाय!

पण, मतदारांनी प्रचारातील विरोधकाचा सूर आणि सत्ताधाऱ्यांची गर्जना याकडे गांभीर्याने पाहणे अपेक्षित असते. राज्यात बेरोजगारीचा मुद्दा असताना सत्ताधाऱ्यांनी आगामी ५ वर्षांत १ कोटी रोजगार देण्याचा संकल्प सांगितला. संकल्प वाईट नाही पण सत्ताधाऱ्यांनी प्रचारावेळी हा रोजगार उपलब्ध कसा होणार यावर फारसा भर दिल्याचे दिसत नाही. सांगायचा मुद्दा असा की, विरोधक जो मुद्दा उचलतात तोही जिव्हाळ्याचा असतो आणि सत्ताधारी जी आश्वासने देताहेत ती देखील तितकीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्रचारातील भाषण ऐकल्यानंतर  'हाव इज जोश' असा प्रश्न मनात नक्की निर्माण होऊ देत. पण मतदान करताना कोणी काय सांगितलं आणि अवती भोवती परिस्थिती काय आहे याचा विचार करुन 'होश' ठेवून बटन दाबण्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी नक्की घ्यावी. 

- सुशांत जाधव

Sushantjournalist23@gmail.com  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 congress leader Rahul Gandhi presence in Maharashtra against BJP sena