पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : ही युती (जागेवरून) तुटायची नाय!

उद्धव ठाकरे, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अखेर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला असेल, असे म्हणायचीही सोय नाही. भांड्यात पडायला मुळात हा जीव कुठेही अडकला नव्हता. कारण युती होणारच, हे जगजाहीर होते. ही घोषणा अपेक्षित होतीच, ती कधी होते याची तेवढी वाट पाहायची होती. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे नावाचे दोन जादूगार आपल्या पोतडीतून काय काढतात, याचीच तेवढी उत्सुकता होती. या जादूगारांच्या पथकाने सोमवारी युतीची घोषणा करून नेपथ्य उभे केले आणि अखेर दोन्ही जादूगारांनी मंगळवारी आपल्या टोपीतून जागावाटपाचे ससे काढले. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी त्या बोलीवरच भाजपशी हातमिळवणी केली होती.

नंदुरबारमध्ये काँग्रेसला धक्का; आमदार रघुवंशी शिवसेनेत करणार प्रवेश

या वाटपानुसार भाजप १६४ जागा आणि शिवसेना १२४ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात भाजपला आपल्या या जागांमधून काही जागा मित्रपक्षांना द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे भाजपला सेनेपेक्षा मोजक्या जागा जास्त मिळतील. भाजपने मंगळवारी अधिकृतपणे १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली, तर शिवसेनेनेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. हे वाटप इतक्या सुरळीतपणे झाले, की हे विधानसभेचे जागावाटप आहे की हॉटेलमध्ये बसण्याच्या जागांची वाटणी आहे, अशी शंका यावी. सेना-भाजपने गुण्यागोविंदाने ही वाटणी करून भाऊबंदकीच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला आहे. "राज्यातील २८८ जागांचे वाटप म्हणजे भारत-पाकिस्तानच्या विभाजनापेक्षा बिकट प्रश्न आहे, " असे शिवसेनेचे संजय राऊत यांनी म्हटले होते. भारत-पाकिस्तानातील त्या अणुयुद्धाचा मागमूसही या वाटपात दिसून आला नाही.

गेली पाच वर्षे तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी या दोन पक्षांची अवस्था होती. आता ती एकदम 'तुझ्या गळा माझ्या गळा' या स्थितीपर्यंत आली आहे. खरे म्हणजे सेना-भाजप युती ही काही जागावाटपावरून मोडणारी युती नव्हतीच. गेल्या तीस वर्षांमध्ये केवळ २०१४ मध्ये ती युती तुटली होती, परंतु ती सुद्धा काही जागांच्या वाटपावरून तुटली नव्हती. त्यावेळेस सेना-भाजपचे बंधन तुटण्याचे कारण होते भाजपच्या वर्चस्वाची सेनेला वाटत असलेली भीती आणि शिवसेनेच्या चिंतेची दखल घेण्यात भाजपला आलेले अपयश.

काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुख, अरविंद शिंदेंना उमेदवारी

गेली काही वर्षे शिवसेना-भाजपचा विषय आला, की छोटा भाऊ आणि मोठा भाऊ ही शब्दावली वापरून शब्दांचे खेळ करण्यात येत होते. छोट्या मुलांच्या उद्यानातील सी-सॉच्या खेळाप्रमाणे हे छोट्या आणि मोठ्या भावाचे पद इकडून तिकडे फिरत होते. कधी ते धनुष्यबाणाकडे जायचे तर कधी कमळाकडे. महाराष्ट्रात आपण मोठा भाऊ आहोत, अशी शिवसेनेची दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनची भूमिका आहे. मात्र वडीलधारे माणूस गेले, की भावाभावांमध्ये बेबनाव व्हावा तसे भाजपने थोरल्या भावाची भूमिका स्वतःकडे घेतली. या भावांचे मोठेपण-धाकलेपण ठरवण्याचा निकष होता तो कोणाकडे किती जागा आहेत हा!

अनेक दशके विधानसभेसाठी शिवसेनेकडे जास्त जागा असायच्या आणि लोकसभेसाठी भाजपच्या. मात्र नरेंद्र मोदी नावाचा एक्का भाजपच्या हातात आला आणि सगळे सिक्वेंस बदलू लागले. भाजपचा डाव बदलला. आसेतू हिमाचल सत्तेचे स्वप्न त्या पक्षाला पडू लागले आणि हे स्वप्न लक्षात आल्यावर शिवसेनेसारख्या पक्षांचे धाबे दणाणले. पक्षाचे बळ वाढले तसे भाजपच्या या भूमिकेला आणखी धार आली. भाजपच्या कमळाचा आकार मर्यादित  होता तोपर्यंत शिवसेनेने त्याला सहन केले. मात्र कमळाच्या पाकळ्या जसजशा विस्तारू लागल्या तसतशा ते  काट्याप्रमाणे शिवसेनेला खुपू लागले. कमळाच्या या वाढण्यामुळे आपल्या अस्तित्वावरच घाला येतो की काय, अशी भीती शिवसेनेला वाटू लागली. शिवसेनेचा हा भयगंड दूर करावा, असे त्यावेळी भाजपला वाटत नव्हते.

यातूनच शिवसेना-भाजपचा तीन दशकांचा संसार २०१४ मध्ये विस्कटला आणि त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविली. भाजपने सर्वात जास्त म्हणजे १२२ जागा मिळवल्या. शिवसेनेला ६३ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी जागावाटप हे निमित्त झाले, खरी गोष्ट आपली दखल न घेण्याचे होते. भाजपच्या शीर्ष मंडळींनी जुन्या पद्धतीप्रमाणे मातोश्रीच्या पायऱ्या चढाव्यात, हा शिवसेनेचा (म्हणजे उद्धव ठाकरेंचा) आग्रह आणि विजयश्री समोर माळ घेऊन उभी असताना मातोश्रीची गरज काय, हा भाजप नेत्यांचा दंभ. अहंकार आणि दंभाच्या या संघर्षात युती तुटली. सख्खा भाऊ पक्का वैरी बनला. मात्र वळणाचे पाणी वळणाला जाते म्हणतात त्याप्रमाणे शिवसेनेने फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर केला. भलेही त्यामागे शिवसेनेची काहीही मजबुरी असो. शिवाय सरकारमध्ये राहूनही सरकारला सतत टोचणी लावायचे कामही तिने केले. केंद्र आणि राज्य सरकारांवर यथेच्छ टीका केली. तरीही त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने जास्त जागा मिळवत पहिला क्रमांक कायम राखला.

दरम्यानच्या काळात अरबी समुद्रात भरपूर पाणी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे गेले. भरती-ओहोट्यांची अनेक चक्रे उलटली. बिहार आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवाने भाजपमध्ये 'शहा'णपण जागे झाले होते. मित्रपक्षांना एकदमच धाब्यावर बसवून पुढे जाता येणार नाही, हे पक्ष नेतृत्वाला कळून चुकले होते. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाला जे अपेक्षित होते ते करायला भाजप नेत्यांनी सुरुवात केली. त्यातच फडणवीस यांच्यासारख्या सिद्धहस्त राजकारण्याने शिवसेनेचा वाघ काबूत आणला. त्यातूनच कोणाच्या खात्यात किती जागा, हा दुय्यम प्रश्न बनला. म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि परवा महाजनादेश यात्रेच्या समारोपातही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेला छोटा भाऊ म्हणून संबोधले तेव्हा शिवसेनेकडून कोणतीही तीव्र प्रतिक्रिया आली नाही.

दबावतंत्राच्या राजकारणाला संपवायचं आहेः शरद पवार

या सर्वांची परिणती म्हणून लोकसभेत भाजप-शिवसेना यांची युती झाली होती. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या. ती युती झाली तेव्हाच विधानसभेत काय होणार, याचीही पटकथा तयार झाली होती. त्या पटकथेचा चित्रपट मंगळवारी शिवसेना-भाजपने सादर केला. आता हा चित्रपट यशस्वी करायचा का नाही, हे मतदार नामक प्रेक्षकावर अवलंबून आहे.

- देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com