पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG: फडणवीसजी विक पॉइंट शोधला, पण स्ट्रोकपूर्वी ही चूक केलीत

देवेंद्र फडणवीस

प्रिय आणि माननीय देवेंद्रजी,
मागील पाच वर्षांतील तुमची कारकीर्द कुणालाही हेवा वाटावी अशीच आहे अन् ती राहिलही पण अखेरच्या टप्प्यात तुम्ही अजित दादांच्या साथीनं गेम फिरवण्याचा खेळलेला डाव अचंबित करणारा होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला होता. निकालानंतर मित्र पक्षानं सोबत येण्यासंदर्भात त्यावेळीही नखरे दाखवल्याचे आठवतयं. त्यावेळी मास्टर माइंड शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याची दर्शवलेली गोष्टही विसरण्याजोगी नव्हती. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची साथ घ्यायची नाही अशी ठाम भूमिका तुम्ही घेतली. तुमच्या या भूमिकेमुळे पार्टी विथ डिफरन्सप्रमाणे फडणवीस इज डिफरन्स लीडर अशी भावना मनात निर्माण झाली.

योग्यवेळी योग्य गोष्टी सांगेन, काळजी करु नकाः देवेंद्र फडणवीस

मराठा क्रांती मोर्चा हे तुमच्या कार्यकाळातील मोठं आव्हान होतं आणि ते तुम्ही लीलया पेललं. महाराष्ट्रातील मोठा समाज लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरल्यानंतर त्याला तुम्ही ज्या संयमाने समोर गेला तो क्षण महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा तुमच्या कार्यकाळातच निकाली निघाला. त्यासोबत दुसरा समाज नाराज होणार नाही याच आव्हानही तुमच्यासमोर होतं. शेतकऱ्यांची अंशतः कर्जमाफी करताना तुम्ही ओबीसी समाजासाठीही अंशतः फॉर्म्युला वापरला आणि त्यांच्यासाठी कोट्यवधीच्या योजना आणून त्यांच्या मनातील खदखद दूर करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी धनगर समाज दुखावला जाणार नाही याचीही तुम्ही काळजी घेतली. बदलत्या समाजात सोशल मीडियाचा प्रभावात असलेल्या प्रत्येकापर्यंत कसे पोहोचायचे आणि सोशल सरकार कसे असावे, हे तुम्ही उत्तमपण दाखवले. सोशल मीडियातून प्रसारणाबाबत टीका झाल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने तांत्रिकबाबी सांगितल्या त्यातून मी सोशल मीडिया तांत्रिकदृष्ट्या कळलेला पहिला मुख्यमंत्री पाहिला.

... म्हणून मुख्यमंत्र्यांशिवाय आमदारांचा शपथविधी पार पडला

महाराष्ट्राला हादरवून टाकलेल्या काही घटनांवर विधानसभेत जेव्हा तुम्ही संयमीपणे बोलायचा तेव्हा प्रमोद महाजन यांच्यातील झलक तुमच्यात दिसायची. अन् वाटायचं केंद्रात जायला महाराष्ट्रात एक तगड नेतृत्व तयार व्हायला सुरुवात झाली आहे. अर्थात विरोधी बाकावर तुम्ही दिसणारच आहात. पण हे व्हायला नको होते. मग हे का झाल? असा प्रश्न मला पडतो. तुम्ही महापालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसेनेविरुद्ध प्रचार करताना घसा बसेपर्यंत ओरडायला सुरुवात केली तिथून याची सुरुवात झाली का? संयमी नेतृत्व गोष्टी लादण्याचा प्रयत्न करतंय असे चित्र निर्माण झाले ते या तुमच्या बदललेल्या शैलीचा परिणाम आहे का? मी पुन्हा येईन या 'मी' पणामुळे आम्ही तुमच्यासारख चांगल नेतृत्व गमावल का? असे अनेक प्रश्न मनात येऊ लागले.

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेनेला मुंबईत पहिला धक्का

तुमच्या सरकारला अभ्यासाला वेळ लागतो अशी टीकाही मी ऐकली आहे. पक्षाच माहिती नाही पण तुमच्या अभ्यासावर आजही शंका नाही. सत्ताधाऱ्यांसोबत असला काय आणि विरोधात बसला काय तुमच्याबद्दलची भावना बदलणार नाही. पण प्रचारावेळी शरद पवार आणि सत्तास्थापनेवेळी अजित दादांच्या नादाला लागून तुम्ही मोठी चूक केली ही भावना आता मनात घर करुन राहिलीये. हा खेळ तुम्ही का मांडला? याच उत्तर शोधताना मला २००७ च्या टी-२० विश्वचषकातील भारत-पाक सामन्याची आठवण झाली. भारताने हा सामना जवळ-जवळ हारला होता. पण मिसबाह उल हकने जोगिंदर शर्माच्या चेंडूवर तो अघोरा शॉट खेळला अन् पाकिस्तानच होत्याच नव्हत झालं. श्रीसंतने झेल घेतला आणि भारताने पहिला विश्वचषक उंचावला. आता यात मिसबाहचा स्ट्रोक चुकला असं काहींच मत आहे. पण मिसबाहने शेवटच्या क्षणी बरोबर धावा होतील असा विक पॉइंट शोधला होता. सामना एकहाती फिरेल याची त्याला खात्री होती, पण जोगिंदर शर्माच्या स्लॉव्हरवनला मिसबाह फसला. अन् दुसऱ्या बाजूला त्याच्या हालचालींचा अंदाज घेत श्रीसंतने जोगिंदर शर्माच्या संथ चेंडूवर टोलावलेला झेल टिपत गेम फिरवला. यात बॅटिंग करणारे फडणवीस होते पण जोगिंदर आणि श्रीसंत कोण? हे सध्याच्या घडीला गुलदस्त्यातच आहे.

- सुशांत जाधव

Sushantjournalist23@gmail.com