मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ben Stokes: स्टोक्सच्या निवृत्तीला ICC जबाबदार; इंग्लंडचा माजी कर्णधार संतापला

Ben Stokes: स्टोक्सच्या निवृत्तीला ICC जबाबदार; इंग्लंडचा माजी कर्णधार संतापला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 19, 2022 11:37 AM IST

स्टोक्सने अवघ्या तीन वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर इंग्लंडच्या चाहत्यांना सोनेरी क्षण अनुभवायला दिले होते, हे क्षण इंग्लंड कधीच विसरु शकणार नाही. त्या स्टोक्सला अशी तडकाफडकी निवृत्ती घ्यावी लागली, हे अत्यंत लाजिरवाणे आहे, असे हुसैन म्हणाले आहेत.

ben stokes
ben stokes

इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्टोक्सने सोमवारी ही घोषणा केली. त्यानंतर बेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसैन यांनी म्हटले आहे. सोबतच, त्यांनी स्टोक्सच्या निवृत्तीचे खापर हे आयसीसीच्या व्यस्त वेळापत्रकावर फोडले आहे. 

हुसैन म्हणाला की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक अतिशय व्यस्त आहे. आयसीसी हे स्वतःच्याच स्पर्धा आणि कार्यक्रम पुढे रेटत असते. मात्र,  प्रत्येक बोर्डाला त्यांचा फ्युचर टुर प्रोग्राम हवा आहे, जेणेकरून ते बोर्ड शक्य तितक्या द्विपक्षीय मालिका आयोजित करू शकतील'. 

इंग्लंडच्या या माजी कर्णधाराने एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्रासाठीच्या लेखात लिहिले आहे की, "खेळात आणखी फॉरमॅट सामील होत आहेत आणि आयपीएल मोठे होत आहे. झाले असे की, यामुळे खेळाची दुरावस्था झाली आहे. खूप व्यस्त वेळापत्रकामुळे खेळावर परिणाम होत आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटला पाठिंबा आहे हे देखील मान्य आहे. परंतु समस्या अशी आहे की, खेळाडूंना त्यांच्या मर्यादेपलीकडे ढकलले जात आहे. त्यांना नियमीत आरामाची गरज असते. त्यामुळेच बेन स्टोक्सला निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला आहे. तो सर्व फॉरमॅटमध्ये खेळतो आणि आता इंग्लंडचा कसोटी कर्णधार आहे. तो प्रत्येक विभागात संपूर्ण योगदान देत आला आहे. स्टोक्सच्या गुडघा दुखावल्याची समस्या रविवारच्या सामन्यात स्पष्टपणे दिसून आली होती". 

तसेच, ज्या स्टोक्सने अवघ्या तीन वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर इंग्लंडच्या चाहत्यांना सोनेरी क्षण अनुभवायला दिले होते, त्या स्टोक्सला अशी तडकाफडकी निवृत्ती घ्यावी लागली, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. २०१९ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये स्टोक्सने ज्या प्रकारची इनिंग खेळली. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये त्याने त्याचे जे रुप दाखवले, ते पाहून आपल्याला अंदाज येतो की, तो वनडेचा किती उत्कृष्ट खेळाडू आहे. 

पुढे नासिर हुसैन यांनी लिहिले की, "शेवटी बेन स्टोक्सने जो निर्णय घेतला आहे, त्याचा मी आदर करतो. मला वाटते की मी त्याला काही काळ विश्रांती घेण्यासाठी, काही द्विपक्षीय मालिकेतून ब्रेक घेण्यासाठी पटवून देऊ शकलो असतो. त्यामुळे स्टोक्सचा उपयोग विश्वचषक आणि मोठ्या स्पर्धांसाठी झाला असता. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात स्टोक्स फलंदाज म्हणून सहज खेळू शकेल", असेही हुसैन म्हणाले.

दरम्यान, स्टोक्स मंगळवारी (१९ जुलै) त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंड ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना डरहममध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर स्टोक्स वनडेला अलविदा करेल.

WhatsApp channel